नंदुरबार - नगरपालिकेच्या ई-भूमीपूजन व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी विरोधी पक्ष भाजपच्या नगरसेवकांना आरक्षित बैठक व्यवस्था मिळाली नाही. त्यामुळे, नगरसेवकांनी सोहळ्यात गोंधळ घातला होता. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर गोंधळ थांबवण्यात आला. मात्र, अपमान करून सभागृहातून हाकलण्यात आल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे.
भाजप नगरसेवकांना कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, पत्रिकेत नाव नसल्याच्या, तसेच कार्यक्रम ठिकाणी सर्व खुर्च्या भरल्याने जागा नसल्याच्या कारणातून भाजप नगरसेवकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. त्यानंतर सत्ताधारी नगरसेवक व कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी केली. त्यामुळे, कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी भाजप नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढण्यास सुरुवात केली. मात्र, तेवढ्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी मध्यस्थी केल्याने वातावरण शांत झाले.