नंदुरबार- नवापूर पोलिसांना अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या दारूसाठ्याला जप्त करण्यात यश आले आहे. सुरत-नागपूर महामार्गावर अवैधरित्या दारुची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती नवापूर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास ही कारवाई.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावर नाकेबंदी करण्यात आली होती. यादरम्यान पोलिसांना महामार्गावरील नावापूर गावाजवळ एक संशयास्पद तवेरा गाडी दिसून आली. त्या गाडीच्या चालकाची विचारपूस केली असता चालकाने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी गाडीची अधिक तपासणी केली. पोलिसांना त्यात 'इंपेरियल ब्ल्यू' या कंपनीचा विदेशी दारूसाठा आढळला. त्याची किंमत जवळपास साडेतीन लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी दारूसाठ्यासह तवेरा गाडी जप्त केली असून गाडी चालकाला आटक केली आहे.