अवैध मद्यसाठा जप्ती प्रकरणी पोलिसांची प्रतिक्रिया नंदुरबार :शहरातील जगतापवाडी परिसरात अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नंदुरबार शहर निरीक्षक रविंद्र कळमकर यांना माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे स्वत: त्यांच्या दोन वेगवेगळ्या पथकासह नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात रोडवर सापळा रचला व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची बारकाईने तपासणी करू लागले. यावेळी पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास एक चारचाकी मोठे वाहन व त्याच्या पाठीमागे एक इनोव्हा वाहन भरधाव वेगाने येताना दिसले. पोलीस पथकातील अंमलदारांनी हातातील टॉर्चच्या सहाय्याने वाहन उभे करण्याचा इशारा दिला. मात्र, चालक भरधाव वेगाने निघून गेला.
अन् वाहनचालकाने काढला पळ :पोलीस पाठलाग करत असल्याचे समजल्याने काही अंतरावर वाहन उभे करून चालकाने पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. नाव विचारले असता त्याने शिवाजी बाबुलाल चौधरी (वय २९ वर्षे, रा.पडावद, नंदुरबार) असे सांगितले. दरम्यान त्याचा एक साथीदार पळून गेला. महिंद्रा पिकअप वाहन (क्र.एमएच ३९ सी ७३०६) या वाहनाची तपासणी केली असता त्यात १४ लाख ४० हजार ७६८ रुपयांचे मद्य व सहा लाख रुपयांचे वाहन असा २० लाख ४० हजार ७६८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
45 लाखांच्या मुद्देमाल जप्त :जप्तमुद्देमाल हा जगतापवाडीमधील मुकेश चौधरी याचा असल्याची माहिती संशयिताने दिल्यानंतर पोलिसांनी जगतापवाडी येथे शोध घेत संशयित मुकेश अर्जुन चौधरी (वय ३३ वर्षे, ह.मु.जगतापवाडी) यास ताब्यात घेतले. त्याच्या घरासमोर उभी असलेली टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा पांढऱ्या रंगाच्या (क्र.एमएच ४३ व्ही ६३५४) कारची तपासणी केली असता त्यात 4 लाख ३० हजारांचे माल्ट व्हीस्कीचे बॉक्स व २१ लाखांचे वाहन असा सुमारे २५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही वाहने व मद्यसाठा असा एकूण ४५ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करत ताब्यात घेण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेले दोघे व एका फरार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई :ही कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, पोलीस हवालदार जगदीश पवार, राजेश येलवे, दीपक गोरे, पोलीस नाईक भटु धनगर, बलविंद्र ईशी, स्वप्नील पगारे, नरेंद्र चौधरी, पोलीस अंमलदार किरण मोरे, इम्राण खाटीक, राहुल पांढारकर, अनिल बडे, युवराज राठोड यांच्या पथकाने केली आहे.
हेही वाचा:
- Solapur Crime News: पालकांनो सावधान! मुलांवर ठेवा लक्ष, दहावीतील विद्यार्थ्याने नववीतील मित्राकडूनच उकळली १० लाख रुपयांची खंडणी
- Chain Theft : सोनसाखळी चोरणाऱ्या अट्टल आरोपीला पोलिसांनी आणले फरफटत
- Tribal Youth Beaten : आदिवासींवर अत्याचार वाढला?, छत्तीसगडमध्ये आदिवासी तरुणाला जेसीबीला बांधून मारहाण