नंदुरबार - आदिवासीबहुल जिल्ह्यात रोजगाराच्या संधी कमी असल्याने अनेक बेरोजगार परराज्यात जातात. त्यात आदिवासी भागांमध्ये महिलांसाठी तर रोजगार नाहीच. मात्र, याला अपवाद ठरले आहे, नवापूर तालुक्यातील श्रवणी गाव. दहा महिलांनी एकत्र येत महिला बचत गट स्थापन केला आणि त्यातून समूह शेती करण्यास सुरुवात केली. या नवदुर्गा समूह शेतीच्या प्रयोगातून लाखोंचा नफा कमवत आहे. त्यांना साथ लाभली ती नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची.
आयएएस महिला अधिकारीने दिला आदिवासी महिलांना मदतीचा हा ग्रामीण भागात महिलांना रोजगाराची संधी नाही. महिलांना चूल आणि मुल सांभाळत परिवाराला मदत करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर या सर्व गोष्टींना फाटा देत श्रावणी येथील प्रमिला संदीप कोकणी ही शिक्षित तरुणी पुढे आली. तिने गावातील दहा महिलांना सोबत घेत प्रगती महिला बचत गटाची स्थापना केली. त्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी वसुमाना पंत यांची भेट घेतली. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविधयोजनांचा फायदा घेत सामूहिक शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्यास सुरुवात केली.
बचत गटातील महिलांनी अगोदर कुक्कुटपालन व्यवसायासाठी आदिवासी विकास विभागाच्या केंद्रीय अर्थसाह्य योजनेतून पोल्ट्रीफार्म सुरु केला. त्यात दहा महिलांनी सामूहिकपणे काम सुरू केले. तीन हजार पक्ष्यांची ४५ दिवस देखभाल करून विक्री केल्यानंतर त्यांना ५५ हजार रुपयांचा नफा होतो. इतक्यावर न थांबता या बचत गटातील महिला सामूहिक शेती करत आहेत. त्यांनी शेड नेट हाऊसमध्ये भाजीपाला शेती करत एका वर्षात ३ लाखाचा नफा कमविला आहे. तर कुकुटपालन योजनेत १५ हजार पक्ष्यांच्या विक्रीतून २५ लाखाचा नफा मिळत असल्याची माहिती प्रगती महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्रमिला कोकणी यांनी दिली. आम्ही आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो असून पोल्ट्री आणि समूह शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनातून दहा महिलांना प्रती महिना ५ ते १० हजार रुपये मिळतात. त्यातून आम्ही घर चालवतो. तसेच पैशाची बचत करत असून आम्हाला समाधान असल्याचे प्रमिला कोकणी यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्ह्यात अनेक समस्या आहेत. त्यात रोजगार आणि दुसरे कुपोषण ही महत्त्वाची समस्या आहे. यातून मार्ग काढायचा असेल तर, महिलांनी पुढे आले पाहिजे, हे माझे पहिले उद्दिष्ठ होते. नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर सात महिला गटांची निवड केली. त्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांतून अर्थसाह्य दिले. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. यातून ७० महिला उद्योजक म्हणून पुढे आल्या आणि आत्मनिर्भर झाल्या, असे मत नंदुरबार प्रकल्प अधिकारी वसुमना पंत सांगतात. एका महिला आयएएस अधिकारी आणि आदिवासी भागातील महिलांनी एकत्र येत हा उपक्रम सुरू झाला. समूह पद्धतीने रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य म्हणजे नारीशक्तीला शेती आणि शेतीपूरक व्यवसायत भक्कम करण्याचे काम निश्चितच अभिमानस्पद आहे.