नंदुरबार - एखद्या नृत्यांगनेला किंवा अप्सरेला लाजवेल असे एकपेक्षा एक सरस नृत्य सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हल मधील अश्व नृत्य स्पर्धेत पाहण्यास मिळत आहेत. देशभरातील कानाकोपऱ्यातून आलेल्या अश्वांनी या स्पर्धेत मनमोहून टाकणारे नृत्य सादर केले.
सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवल घोड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या यात्रोत्सवात घोड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असते, यातलाच एक भाग घोड्यांचे नृत्य आहे. कधी डफाचा ताल तर कधी राजस्थानी वाद्य संगीत तर कधी पंजाबी भांगडा तर मध्येच हलगीचा लय अशा विविध तालांवर चेतक फेस्टिव्हलमधील अश्व नृत्य स्पर्धेत घोड्यांचे नाचकाम सुरू होते. कुणी बाजेवर तर कुणी चौरंगावर कुणी चारचाकी गाडीवर तर कुणा एका घोड्याने बुलेटवर उभे राहून नृत्य सादर केले. तर, सर्वात अधिक लक्ष वेधून घेतल ते विना लगाम नृत्य करणाऱ्या घोड्यांनी कारण, विना लगाम घोडा नियंत्रण करणे शक्य नाही. असे असतांना काही घोड्यांनी फक्त आपल्या प्रशिक्षकांच्या इशाऱ्यावर नृत्य सादर केले. त्यामुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या अश्व शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले.