नंदुरबार- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या कार्यक्रमानुसार 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान घेण्यात येणार आहे. मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना निवडणुकीच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली. याची माहिती जिल्हा अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली.
हेही वाचा-शिवसेनेशी वाईट वागले त्याचे फळ आता मिळतंय, उध्दव ठाकरेंचा पवारांना टोला
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयानुसार मतदार कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना सुटी देण्यात यावी. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदी सर्वांना लागू राहील. यात खासगी कंपन्या, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाटक, व्यापार, औद्योगिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर आणि अन्य आस्थापनांचा देखील समावेश आहे.
हेही वाचा-भारतीय रिझर्व्ह बँकेची लक्ष्मी विलास बँकेवर तत्पर सुधारात्मक आकृतिबंधाची कारवाई, 'ही' आहेत कारणे
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना मतदान क्षेत्रातील कामगारांना सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासाची सवलत देता येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी आवश्यक असेल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता सर्व आस्थापनांनी घ्यावी.
मतदारांकडून मतदानासाठी सुट्टी अथवा योग्य सवलत न मिळाल्याने मतदान न करता आल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधिताविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केले आहे.