नंदुरबार- शहादा तालुक्यात भरधाव ट्रक विष्णु मंदिरावर धडकला. यामध्ये वाहन चालक गंभीर जखमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना शनिवारी घडली आहे. लांबाेळा गावात रस्त्याच्या बाजूला असलेल्या विष्णू मंदिरात सुसाट वेगाने येणारा सोळा चाकी ट्रक घुसल्याने मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शहादा ते लांबोळादरम्यान तीन ठिकाणी ट्रक चालकाने शहादा शहराकडे जाणाऱ्या वाहनचालकांना हुलकावणी दिली. मात्र, त्यापैकी शहरातील गुजर गल्लीतील वाहनाला ट्रक चालकाने कट मारल्याने वाहनाचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसान झालेल्या वाहनचालकाने ट्रकचा पाठलाग केला. त्यानंतर ट्रक चालकाने ट्रक सुसाट वेगाने चालवला. लांबाेळा गावाजवळ आल्यानंतर समोरुन अवजड वाहन आल्याने ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. व ट्रक सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या विष्णू मंदिरात घुसला.