नंदुरबार - गुजरात राज्यातून नंदुरबारमार्गे अहमदनगर येथे जाणाऱ्या गाडीसह सुमारे 26 लाख 29 हजार रूपये किंमतीचा गुटखा पोलिसांनी पकडला आहे. शुक्रवारी पहाटे 5.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामुळे गुटखा व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊनचे नियम कडककरण्यात आले आहेत. बाहेरगावाहून येणार्या-जाणार्या वाहनांना जिल्हा प्रशासनाने काही नियम लागू केले आहेत. तरीही जिल्हयातून अवैधरित्या गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नंदुरबार हा जिल्हा गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सिमेवर असल्याने या ठिकाणाहून अवैधरित्या तस्करी सुरू असते.
गुजरात राज्यातील निझर येथून आयशर गाडीमध्ये भरून विमल गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. या माहीतीनुसार, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने निझर रस्त्यावरील मन्सूरी टेंट हाऊसजवळ सापळा रचला. पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास टाटा आयशर (क्र.एमएच 16-सीसी 8624) गाडी पोलिसांना दिसली. यावेळी पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली असता गुरांचे खाद्य असलेल्या ढेपांच्या पोत्यांच्याआड गुटखाच्या मोठा साठा आढळून आला.
दरम्यान, वाहनचालक भास्कर विजय भोसले व मोहम्मद अझरूद्दीन शेख यांना पोलिसांनी विचारपूस केली असता, त्यांनी गुजरातमधून हा गुटखा आणल्याचे सांगितले. निझर येथील भावेश उर्फ शितल अग्रवाल यांच्याकडून अहमदनगर येथील मोसीन पटेल यांच्याकडे गुटखा घेवून जात असल्याची त्यांनी पोलिसांना माहीती दिली. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून गाडीमधून 11 लाख 66 हजार 880 रूपये किंमतीचा गुटखा, दोन लाख 5 हजार 920 रूपये किमतीची 208 तंबाखूची पाकीटे आणि 12 लाखांची गाडी असा एकूण 26 लाख 29 हजार 800 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुकेश तावडे, पोलीस नाईक राकेश मोरे, राकेश वसावे, दादाभाई मासुड, महेंद्र सोनवणे, आनंदा मराठे, राजेंद्र काटके, किरण मोरे, अभय राजपूत या पथकाने केली आहे.