नंदुरबार - गुजरात राज्यातील निझर येथुन गुटखा साठा क्रुझर गाडीने अवैधरित्या नंदुरबारमार्गे शिंदखेडा येथे वाहतूक केला जात होता. नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचल्याने नंदुरबार ते निझर रस्त्यादरम्यान पथराई फाट्याजवळ येणार्या क्रुझर गाडीला अडवून तपासणी केली असता 3 लाख 20 हजार रुपये किंमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला विमल पान मसाला व तंबाखु साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून चौघांविरुध्द नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात नंदुरबारच्या गुटखा किंग होलाराम सिंधी याचा समावेश आहे.
गुजरात राज्यातून नंदुरबारमार्गे शिंदखेडा येथे गुटखा व तंबाखु साठ्याची वाहनाद्वारे वाहतुक होत असल्याची माहिती नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली. त्यांनी पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या. यावेळी पोलीसांच्या पथकाने निझर ते नंदुरबार रस्त्यादरम्यान पथराई फाट्याजवळ सापळा रचला. यावेळी येणार्या वाहनांची चौकशी करीत असतांना एका क्रुझर गाडी (क्र.एम.एच.06- ए.बी.8627) आल्याने सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात विमल पान मसाला व तंबाखु साठा मिळून आला. यावेळी चालक व सहचालकाला विचारपूस केल्यावर त्या दोघांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलीसांनी खाक्या दाखविताच संशयित दोघांनी विमल पान मसाला व तंबाखु साठा असल्याचे सांगितले.
गुजरात राज्यातुन नंदुरबारमार्गे गुटख्याची तस्करी सदरचा गुटखा साठा नंदुरबार येथील होलाराम सिंधी यांच्या निझर येथील गोडावूनमधून क्रुझर गाडीमध्ये भरुन नंदुरबारमार्गे शिंदखेडा येथे देविदास पितांबर चौधरी उर्फ देवा चौधरी यांच्याकडे घेवून जात असल्याचे सांगितले. यावेळी पथकाने विमल पान मसाल्याचे एकुण 7 पोते, प्रत्येक पोत्यात चार लहान पांढर्या रंगाच्या चार गोण्या व त्यात विमल पानमसाल्याची 52 सीलबंद पाकीटे (2 लाख 72 हजार 272 रुपये किंमतीचे) तसेच व्ही-1 तंबाखुच्या 7 गोणी प्रत्येक गोणीत तंबाखुचे 52 सीलबंद पाकीटे (48 हजार 48 रुपये किंमतीचे) असा एकुण 3 लाख 20 हजार 320 रुपयांचा विमल पानमसाला व तंबाखुसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच क्रुझर वाहन 7 लाख रुपये किंमतीचे असा एकुण 10 लाख 20 हजार 320 रुपये किंमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.
याबाबत विशाल महेंद्र नागरे यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुटखा वाहतुक करणारे चालक रविंद्र तुळशीराम पाटील, भरत हिलाल बडगुजर (दोघे रा.शिंदखेडा) या दोघांसह नंदुरबार येथील होलाराम सिंधी, देविदास पितांबर देविदास चौधरी उर्फ देवा चौधरी (रा.शिंदखेडा) या चौघांविरुध्द भादंवि कलम 188, 270, 271, 272, 273, 34 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) सह साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम 2, 3, 4 व अन्नसुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 26 (2), (4), 30 (2) (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक सुनिल साळूंखे, नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, सजन वाघ, प्रमोद सोनवणे, बापु बागुल, विशाल नागरे, यशोदिप ओगले यांच्या पथकाने केली.