नंदुरबार - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर होणाऱ्या उपचाराबाबत तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर कशापद्धतीने उपचार होत आहेत, त्यांना कोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद देखील साधला. के. सी. पाडवी यांनी यावेळी पीपीई कीट घालून रुग्णांशी संवाद साधला.
दरम्यान कोरोनाबाधितांना चांगल्या सुविधा देण्यात याव्यात, कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता अधिक सुविधा निर्माण कराव्यात, रुग्णांवर योग्य ते उपचार करावेत, अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. पाडवी यांनी यावेळी रुग्णांशी संवाद साधत, कोरोनामुळे घाबरून जावू नका, डॉक्टरांच्या सूचनेनुसार उपचार घ्या असे आवाहन देखील त्यांनी यावेळी रुग्णांना केले.
पालकमंत्र्यांसोबत अधिकाऱ्यांनीही दिली रुग्णालयाला भेट