नंदुरबार - देशातील दुसऱ्या क्रमांकाचा घोडेबाजार म्हणून सारंगखेड्याच्या घोडा बाजाराची ओळख आहे. गेल्या २ वर्षांपासून या घोडेबाजाराला जागतिक स्तरावर नेण्यासाठी 'महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ' आणि 'लल्लूजी अँड सन्स' या कंपनीमध्ये करार झाला होता. हा करार वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर राज्य सरकारने हा करार रद्द केला आहे. त्यामुळे सारंगखेडा येथे भरणाऱ्या 'चेतक फेस्टिवल'वर प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, यावर्षी चेतक फेस्टिवल होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
सारंगखेडा येथील घोडेबाजाराला ग्लोबल रूप देण्यासाठी पर्यटन महामंडळाने १० वर्षांसाठी लल्लूजी अँड सन्स या कंपनीसोबत करार केला होता. मात्र, शासकीय नियमात हा करार बसत नसल्याने राज्य सरकारने हा करार रद्द करण्याचा आदेश दिला आहे. शासनाने करार रद्द करण्याचा आदेश दिला असला तरी, सारंगखेडा येथील 'चेतक फेस्टिवल'वर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चेतक फेस्टिवल मोठ्या उत्साहात साजरा होणार असून घोड्याच्या सर्व स्पर्धाही होणार आहेत. सारंगखेड्याच्या घोडेबाजाराला मोठी परंपरा असल्याने सरकार सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल असा विश्वास आयोजक जयपालसिंह रावल यांनी व्यक्त केला आहे.