नंदुरबार - शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे सोने खरेदीच्या बहाण्याने भरदिवसा तब्बल अडीच लाखांच्या सोन्याच्या दागिन्याची चोरी केल्याची घटना घडली आहे. दुकानात आलेल्या चोरट्याने सोन्याचे दागिने दाखविणार्या दुकानातील ज्येष्ठ नागरिकाची दिशाभूल करत ही चोरी केली. पाचशे रुपयांची नोट देऊन चोरट्याने सुमारे साडेचार तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. हा चोरटा दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे याच दुकानात तीन वर्षांपासून अशाच प्रकारची चोरी झाली होती.
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील सेंट्रल बँकेजवळ नरेंद्र सोनार यांचे श्रीकृष्ण ज्वेलर्स दुकान आहे. या दुकानात दुपारच्या सुमारास एक तरुण डोक्यावरील टोपीला चष्मा लावून आणि तोंडाला रुमाल बांधून आला. सोने खरेदी करणार असल्याचे सांगून काऊंटरजवळ उभा राहिला. नरेंद्र सोनार यांच्या वडिलांनी त्यास सोने दाखविण्यास सुरुवात केली. या चोरट्याने हातात पाचशेच्या नोटा दाखवत सोने खरेदी करत असल्याचा बहाणा करून सोनार यांच्या वडिलांची दिशाभूल केली. नंतर अडीच लाखांचे साडेचार तोळे सोने घेऊन पोबारा केला. नरेंद्र सोनार यांनी लागलीच सारंगखेडा पोलीसांना माहिती दिली.
हेही वाचा -कोविड रूग्णांना मारहाण करत रुग्णालयाची नासधुस; तिघांना अटक