नंदुरबार -गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या ( Gandhidham Puri Express catches fire ) दोन डब्यांना नंदुरबार रेल्वे स्थानकापासून ( Nandurbar Railway Station ) काही अंतरावर आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात रेल्वे प्रशासन व नंदुरबार नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला यश आले आहे. सुमारे दोन तासांपेक्षा अधिक सुरू असलेल्या या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही तर आग विझवतांना रेल्वे कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. सुमारे चार तासानंतर सुरत-जळगाव लोहमार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
- गांधीधाम पुरी एक्सप्रेसला अचानक आग -
गांधीधाम येथून पुरीच्या दिशेने ही ट्रेन निघाली होती. गाडी नंदुरबार रेल्वे स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर असताना एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीच्या डब्यात अचानक आग लागली. हा प्रकार लक्षात येताच ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली. नंतर रेल्वेतील प्रवाशी गाडीतून बाहेर पडले. घटनास्थळी नंदुरबार अग्निशमन दलाच्या चारपेक्षा अधिक बंब दाखल झाले होते. सुमारे दोन तासांपेक्षा अधिक काळ ही आग चालली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना व अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
- ...आणि अनर्थ टळला -
गांधीधाम - पुरी एक्सप्रेसमधील पॅन्ट्री कार कोचला आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागलेल्या कोचच्या दोन्ही बाजूला एसी कोच असल्यामुळे आग इतर डब्यांना लागू नये म्हणून रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूचे डब्बे वेगळे करून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीच्या डब्याला ही आग लागली. पॅन्ट्रीच्या डब्यात खानपानाचे साहित्य, सिलिंडर असल्याने आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला असता. म्हणून रेल्वे प्रशासनाने डब्यातील सिलेंडर व इतर साहित्य बाहेर फेकले त्यामुळे अनर्थ टळला.
- जळगाव ते सुरत दरम्यानच्या रेल्वे मार्गातील विद्युतपुरवठा बंद -