नंदुरबार - नवापूर तालुक्यातील गडदाणी शिवारात बिबट्याची शिकार करणार्या चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या चौघांना ताब्यात घेत वनविभागाने नंदुरबार येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता त्यांना वनविभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
शिकार करण्यात आलेल्या बिबट्यांचे अवयव जप्त
नवापूर तालुक्यातील गडदाणी शिवारातील जंगलात दोन बिबट्यांची शिकार करुन पंजे, कातडी, दात कापून बिबट्याचे मृतदेह जमिनीत पुरण्यात आले. या घटनेची कानकुन लागताच वनविभागाने लागलीच जंगलात जावून झाडाझडती घेतली असता कुजलेल्या अवस्थेत बिबट्याचा सांगाडा आढळून आला असून अवयव जप्त करण्यात आले आहेत. या बिबट्याचे चारही पाय कापलेले, खालचा जबडा तोडलेला तसेच अर्धवट कातडी काढलेली आढळून आली.
सूडबुद्धीने विषप्रयोग करून केली शिकार
याप्रकरणी वनविभागाने गडदाणीतील चार संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली. यातील सुरत्या खंड्या गावीत या मालकीच्या पाळीव गायीला बिबट्याने हल्ला करुन ठार केल्यामुळे सुडबुध्दीने विष प्रयोग करत बिबट्याची शिकार करण्यात आली.
संशयित आरोपी न्यायालयात हजर
दोन्ही बिबट्यांच्या मृत्यूप्रकरणी वनविभागाने सुरत्या खंड्या गावीत, रणजित मोत्या गावीत, विजय नानजी गावीत, अशोक धिरजी गावीत या चार संशयितांना ताब्यात घेऊन बिबट्यांचे दात, पंजे, कातडी हस्तगत करण्यात आली. संशयितांना नंदुरबार येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता चौघांनाही 24 डिसेंबरपर्यंत वनविभागाच्या वनकोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
हेही वाचा -मोठ्या आवाजाच्या 'सायलेन्सर'वाल्या बुलेटवर वाहतूक शाखेची धडक कारवाई
हेही वाचा -नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात सिझरचे प्रमाण अधिक