नंदुरबार - वनविभागाच्या पथकाने छापा टाकुन घरातुन अवैध लाकुडसाठ्यासह रंधा मशिन जप्त केल्याची कारवाई नवापूर तालुक्यातील कोकणीपाडा येथे केली. या कारवाईत सुमारे तीन लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाकडी साहित्य बनविण्याचा कारखाना -
नवापूर तालुक्यातील कोकणीपाडा येथे एका घरात लाकडाचे साहित्य बनविण्यात येत होते. वनविभागाच्या पथकाला माहिती मिळाल्याने कोकणीपाडा येथे पथकाने जावुन घरावर धाड टाकली. यावेळी बोकरु रामसिंग कोकणी यांच्या घराची झाडाझडती घेतली असता साग लाकडाचे 220 नग, एक पलंग सेट, एक रंधा मशिन, इलेक्ट्रीक मोटारसह तीन डिझाईन मशिन असे एकुण 3 लाख रुपयांचे साहित्य मिळुन आले. पथकाने सदर लाकुडसाठा व साहित्य जप्त करुन वाहनाने नवापूर येथील शासकीय विक्री आगारात जमा केला आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली कारवाई -
याप्रकरणी बोकरु रामसिंग कोकणी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई धुळे मुख्य वनसंरक्षक डि.वा.पगार, नंदुरबार वनविभाग शहादा उपवनसंरक्षक एस.बी.केवटे, विभागीय दक्षता अधिकारी उमेश वावरे, सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार शहादा धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार वनविभागातील अधिकारी व नवापूर पोलीसांनी केली.