नंदुरबार- शेतालगतच्या नाल्यात पालापाचोळ्यात लपविलेला खैरजातीचा लाकुडसाठा नंदुरबार वन विभागाने कारवाई करत जप्त केला आहे. तसेच लाकडाची अवैध वाहतूक करताना टेम्पो जप्त करण्यात आला आहे. खांडबारा येथे ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैधरीत्या शेतीकाम करताना मिळाल्याने वनविभागाने ट्रॅक्टर जप्त केले आहे. नंदुरबार वनक्षेत्राच्या हद्दीत खैर जातीचे लाकूड शेतात लपविल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना मिळाली होती.
नवापुरात जामतलाव शिवारातील नाल्यातून खैर लाकूड जप्त; वन विभागाची कारवाई - illegal transport of wood
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खैरजातीचा लाकूडसाठा जप्त करत तो शासकीय विक्री आगारात जमा केला. अवैधरीत्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर देखील कारवाई करण्यात आली. वनविभागाच्या हद्दीत शेतीकाम करणारा ट्रॅक्टरही वन विभागाने जप्त केला.
नवापूर तालुक्यातील जामतलाव येथील शिवारात जाऊन वन विभागाच्या पथकाने तपासणी केली असता एका नाल्यात पालापाचोळ्यामध्ये खैरजातीच्या लाकडाचे 46 नग लपविण्यात आल्याचे आढळून आले. पथकाने लाकूडसाठा जप्त करून नवापूर येथील शासकीय विक्री आगारात जमा केला आहे. याप्रकरणी संशयिताविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच नंदुरबार वनक्षेत्रात लाकडांची अवैध वाहतूक करताना पथकाने एक टेम्पो जप्त केला आहे. तर
वन विभागाला नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे बांगडानियत क्षेत्र कक्षेमध्ये एक जण अवैधरीत्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करताना सापडला. यावेळी वन विभागाच्या पथकाने ट्रॅक्टर जप्त करुन भारतीय वन अधिनियम 1927, महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई नंदुरबार वन विभाग शहादाचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे, विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर, चिंचपाडा आणि नंदुरबार वन विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या केली आहे.