नंदुरबार - शहरातील जुना बैल बाजार परिसरात पतंग उडविण्याच्या कारणावरुन वाद होवून दोन गटात सशस्त्र हाणामारी झाली. यात एकाचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिसाहब मोहल्ला जुना बैल बाजार परिसरात दोन गटात लहान मुले पतंग उडवित होते. यादरम्यान, त्यांचा एकमेकाशी वाद झाला. याचा राग मनात धरत, 12 सप्टेंबर रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास दोन्ही गटातील मोठ्या लोकांनी लोखंडी पाईप, लाकडी डेंगारे व हाताबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली. यात एकाचा मृत्यू झाला.
लियाकत शाहिद बागवान यांनी या प्रकरणीत तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, पतंग उडविणार्यावरुन वाद झाला. तेव्हा संशयितांनी शिवीगाळ केली. तसेच लाठ्याकाठ्या, लोखंडी पाईपने मारहाण केली. इतकेच नव्हे तर घरावर दगडफेक करुन आयशाबी शाहिद बागवान, हारुन युसूफ कुरेशी, सायराबी हारून कुरेशी यांना मारहाण केली. यावेळी काही जण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही संशयितांनी मारहाण केली. या मारहाणीत हारुन युसूफ कुरेशी यांच्या छातीवर दगड लागल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.