नंदुरबार - जिल्ह्यात एकाच दिवशी 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. त्यातील नंदुरबार व विसरवाडी येथील दोन बाधितांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्हावासियांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. नंदुरबारातील एका 71 वर्षीय वृध्द तर विसरवाडीतील 52 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच दिवशी कोरोनामुळे दोन मृत्यू होणे ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. यामुळे जिल्ह्यात मृतांचा आकडा 14 वर पोहोचला असून बाधितांची संख्या 284 झाली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात महिन्याभरापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 300 च्या जवळपास येवून ठेपली आहे. गेल्या पाच दिवसांपासून येणार्या अहवालांमध्ये दररोज दहाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. मंगळवारी एकाच दिवशी पुन्हा 15 रुग्णांची भर पडली आहे.
सकाळी आलेल्या अहवालात तीन जण पॉझिटिव्ह आढळले आहे. यात नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील 52 वर्षीय महिला, नंदुरबार येथील जयवंत चौकातील 71 वर्षीय वृध्द पुरुष तर भोई गल्लीतील 52 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या तिघांवर उपचार सुरु असताना नंदुरबारच्या जयवंत चौकातील 71 वृध्दाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. तर विसरवाडीतील 52 वर्षीय महिला उपचार घेत असताना सायंकाळी मृत्यू झाला. यामुळे एकाच दिवशी कोरोनाचे दोन बळी गेले आहेत.