नंदुरबार - जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातीला पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे पेरण्या रखडल्या होत्या. मागील दोन ते तीन दिवसांपासुन जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरणीच्या लगबगीला शेतकरी लागले आहेत. पेरणीसाठी युरिया खताची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांनी खत विक्रेत्यांकडे एकच गर्दी केली आहे. त्यामुळे खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन बॅग दिल्या जात आहेत. तर खताचा मुबलक प्रमाणावर साठा उपलब्ध होणार आहे, शेतकऱ्यांनी खतांची साठवणूक करू नये असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
नंदुरबारमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांच्या रांगा ...म्हणून उडालाी युरियासाठी झुंबड -
यंदा पाऊस तब्बल एक महिने उशिरा आल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या थांबल्या होत्या. गेल्या दोन-तीन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात का होईना पेरणीसाठी लागणारा पाऊस झाला आहे. म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लागणारी युरिया खत खरेदीसाठी खत विक्रेत्यांकडे एकच झुंबड उडाली.
प्रत्येक शेतकऱ्याला फक्त दोन खतांच्या बॅग -
नवापूर शहरातील डायमंड कृषी सेवा केंद्रात खत उपलब्ध झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. शेतकऱ्यांची मागणी जास्त आहे. परंतु, कृषी सेवा केंद्राकडून तीनशे रुपये प्रति बॅगप्रमाणे एका शेतकऱ्याला दोन बॅग वाटप सुरू आहे. रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांपैकी 50 ते 60 शेतकऱ्यांनाच उपलब्ध युरिया खत मिळाले. उर्वरित शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.
मुबलक पुरवठा उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी -
शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खत उपलब्ध करून द्यावे जेणेकरून पेरणी करणे सोपे होईल, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या युरिया खताची मागणी लवकर पूर्ण करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरवर्षी शासकीय कृषी शेतकी संघाच्या मार्फत शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरवठा केला जातो. परंतु यंदा शेतकी संघांमध्ये खत उपलब्ध झाले नसल्याचे कृषी विभागा कडून सांगितले जाते. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये युरिया खताचा तुटवडा भासत असल्याने युरिया खताचा काळाबाजार होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
खतांचा साठा करू नये - जिल्हा कृषी अधिकारी
नंदुरबार जिल्ह्यात मुबलक प्रमाणावर खत उपलब्ध होईल. यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर पेरणी होईल व त्यासाठी लागणारे खत उपलब्ध केले जाईल असे जिल्हा कृषी अधिकारी यांनी सांगितले. परंतु शेतकऱ्यांनी पाहिजे तेवढेच खत घ्यावे. खताचा साठवणूक करू नये असे आव्हान कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.