नंदुरबार- निसर्ग चक्रीवादळामुळे नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. जोरदार पाऊस आणि वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यामुळे, शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या तर आंबा आणि चारोळी या पिकांचेही नुकसान झाले. याचे पंचनामे लवकरात लवकर करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारी आलिबागजवळ धडकले. यावेळी ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहात होते. साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास वादळाने किनारा ओलांडून राज्यात प्रवेश केला. याच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक ठिकाणी वेगवान वाऱ्यासह पाऊस झाला. यात शहादा तालुक्यात राणीपूर आणि म्हसावद परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.