नंदुरबार - शेतकऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना नवापूर तालुक्यातील श्रावणी शिवारात घडली आहे. भटुलाल काशिनाथ परदेशी (वय 50), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुध्द विसरवाडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खांडबारा येथील रहिवासी भटुलाल परदेशी यांची श्रावणी शिवारात शेती आहे. परदेशी हे शेतावर लक्ष देण्यासाठी शेतातील घरात मुक्कामाला थांबले होते. भटुलाल परदेशी यांच्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी येणार असल्याने त्यांचा मुलगा मिलिंदकुमार याने वडिलांशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे मिलिंदकुमार वडिलांना शेतात घेण्यासाठी गेला असता वडील मृतावस्थेत आढळले. भटुलाल परदेशी यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. रक्ताचा डाग असलेला दगडही घटनास्थळावर आढळला.