नंदुरबार- तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादक शेतकरी असून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकविला जातो. हा भाजीपाला गुजरात आणि मध्यप्रदेशमधील मोठ्या शहरांमध्ये पाठविला जातो. मात्र, बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांनी नागरिकांना मोफतमध्ये शेतातून भाजीपाला घेऊन जाण्यास सांगितले. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून शेतकऱ्याने तीन एकर क्षेत्रावरील वांग्याच्या पिकात गुरे चारण्यास सोडून दिले आहेत.
नंदुरबार शहरातील माळीवाडा भागात राहणारे शेतकरी विजय माळी यांनी १ लाख रुपये खर्च करून वांग्याची लागवड केली. आता वांगे निघण्यास सुरुवात झाली आणि त्याचवेळी लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहिली. यामुळे, वांगे खरेदी करण्यास व्यापारी तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी संपूर्ण परिसरातील नागरिकांना वांगे मोफत घेऊन जाण्यास सांगितले. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून त्यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रावरील वांग्याच्या पिकात गुरे सोडून दिली आहेत.