नंदुरबार -मध्यप्रदेशहून चिखली पुनर्वसन येथे भजन किर्तनासाठी जाणार्यांची क्रुझर गाडी तोरणमाळ नजीकच्या दुर्गम भागातील सिंदीदिगर घाटात खोल दरीत कोसळली. यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडली आहे. या अपघातात चार जण जखमी झाले असून, त्यातील तिघांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरीत गाडी कोसळत असताना अनेकांनी जीव वाचवण्यासाठी गाडीबाहेर उड्या टाकल्याने त्यात काही जण जखमी झाले आहेत. तोरणमाळ व म्हसावद ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे सिंदीदिगर घाटात मृतदेह पडलेले होते. दरम्यान, मागील पाच महिन्यांपूर्वी देखील खडकी पॉईंटनजीक घाटात प्रवासी गाडी कोसळुन 8 ते 9 जण जागीच ठार झाले होते. सहा महिन्यात तोरणमाळ नजीकच्या घाटात दुसर्यांदा हा भीषण अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवामानाचे ठिकाण असलेले तोरणमाळ येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. पुरणाच्या प्रसिद्ध असलेल्या सीताखाई, खडकी पॉईंट, यशवंत तलाव त्याचबरोबर महाशिवरात्री या दिवशी गोरक्षनाथ महाराजांची यात्रा प्रसिद्ध आहे. गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील पर्यटकांसह भाविक मोठ्या संख्येने येथे हजेरी लावत असतात.
- सहा महिन्यात दुसर्यांदा अपघात; 15 प्रवासी गंभीर -
राज्यातील दुसर्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या धडगांव तालुक्यातील तोरणमाळ नजीकच्या सिंदीदिगर घाटात काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. मध्यप्रदेशातील काही नागरिक शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन येथे भजन किर्तनासाठी क्रुझर गाडीने तोरणमाळमार्गे येत होते. सिंदीदिगर रस्त्याने येत असतांना तोरणमाळकडे येणार्या रस्त्यावरील घाटात चढाव चढीत असतांना गाडी दरीत कोसळली. यामुळे गाडीतील नागरिक घाबरल्याने त्यातील काहींनी जीव वाचविण्यासाठी गाडीबाहेर उड्या मारल्या. घाटातून खोल दरीत गाडी कोसळल्याने झालेल्या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, दरीत कोसळलेली गाडी पुर्णतः चक्काचूर झाली होती. तर रस्त्यांवर मृत प्रवाशांचे मृतदेह पडून होते. गाडी दरीत कोसळताच प्रवाशांनी बचावासाठी किंकाळ्या केल्या. परंतु, हा अपघात अतिदुर्गम भागात घडल्याने परिसरातील नागरिकांना उशिराने कळले.
अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक पोलिसांनी देखील घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करत जखमींना अन्य वाहनांनी तोरणमाळ व म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी जीवन चौधरी, करम चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी मदतकार्य केले. परंतु सिंदीदिगर हा परिसर नेटवर्कींगमध्ये कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर व खडतर भागात असल्याने मदतकार्य करण्यास अडचणी आल्या. अपघातातील मृत आठ जण हे मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांच्या मृतदेहावर तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तसेच चार जण जखमी झाले असून, त्यातील तीन जण फ्रॅक्चर झाले असल्याने उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तर एका जखमीवर तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तोरणमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात झापीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.एस.रावले, डॉ.सुहास पाटील, डॉ.खरात यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले.