नंदुरबार - राज्य शासनाने इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व शिक्षक व व संस्थाचालकांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आजपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत.
जिल्ह्यातील 1114 शाळा सुरू
जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरू झाले असून गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा पाहण्यास मिळाला. जिल्ह्यातील 1114 शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. यावेळी योग्य ती खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील शिक्षकांची कोरोनाचाचणी
शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना शाळा सुरू होण्याआधी शिक्षकांची कोरोनाचाचणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शाळा सुरू होण्याच्या अगोदर चाचणी करण्यात आली. आजपासून प्रत्यक्षात शाळांना सुरुवात झाली. विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता शाळांनी एक दिवसाआड वर्गांचे नियोजन केले आहे. आज शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन पाहणी केली.
शिक्षणाधिकार्यांनी दिली शाळांना भेट
इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी शहरातील विविध शाळांना भेट देऊन तपासणी केली. याप्रसंगी त्यांनी संस्थेतर्फे करण्यात आलेल्या चाचण्यांची तपासणी केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.