नंदुरबार -जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने गुजरात राज्यात रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले मजूर लाॅकडाऊनमुळे काम नसल्याने जिल्ह्यातील आपल्या गावी परतले आहेत. परंतु गावी येऊन गावात रोजगार नसल्याने पोट कसे भरावे ? असा गंभीर प्रश्न त्यासमोर आ वासून उभा होता. हतबल झालेल्या मजुरांना अशा बिकट परिस्थितीत नंदुरबार जिल्हा प्रशासनाने मनरेगा योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील 40 हजार स्थलांतरित व स्थानिक मजुरांच्या हाताला काम मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
नंदकुमार वाळेकर, गट विकास अधिकारी नंदुरबार जिल्ह्यात जाॅब कार्ड धारकाची संख्या ३ लाख ६ हजार ५३९ एवढी असून १ लाख ४६ हजार २२५ मजुर कामात कार्यरत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात एकूण ५९७ ग्राम पंचायती असून त्यातील ५०० पेक्षा जास्त ग्राम पंचायत क्षेत्रातील मजुरांना मनरेगा योजनेंतर्गत काम मिळाले आहे. या योजनेतील काम दोन महिन्याना पर्यंत काम चालू राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी दिली.
गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने स्थलांतरित मजुरांमधील असंतोष कमी झाला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर मजुरांना आर्थिक आवक होत असल्यामुळे शेतीकामासाठी निश्चितीच मोलाची मदत होणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मागेल त्याला काम मिळत असल्यामुळे कोरोना विषाणूची लागण होण्यास प्रतिबंध होऊ शकेल. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात समाधानाचे वातावरण आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पातून गाळ काढण्यात येत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. एक मजूर एका दिवसात १ क्यूबीक मीटर गाळ काढतो. परिणामी १००० लीटर पाणी साठवण क्षमता तयार होते व त्याच्या दुप्पट पाणीसाठा भूगर्भात वाढतो. सदर गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक होऊन उत्पादन वाढीस निश्चित मदत होते. त्याच सोबत मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहेत. मजुर तोंडाला मास्क लावून व सोशल डिस्टन्सचे पालन करीत गाळ काढण्याचे काम करीत आहे. प्रत्येक कुटुंब लाॅकडाऊन नियमावलीचे पालन करून नेमून दिलेले काम करीत आहे. या कामासाठी प्रति दिवस २३८ रूपये मजुरी दिली जात असून ती आठवड्या अखेर थेट मजूरांच्या बॅंक खात्यात जमा केली जाते.