नंदुरबार- शहादा तालुक्यातील वडछील येथे गणपती विसर्जनाच्या वेळी जलसंधारणाच्या कामातून तयार केलेल्या तलावात सहा मुलांचा बुडून दुर्दैवी अंत झाला. यातील चार जण हे एकाच कुटुंबातील होते. कैलास संजय चित्रकथे (१७), सचिन सुरेश चित्रकथे (१९), विशाल मंगल चित्रकथे (१७), दीपक सुरेश चित्रकथे (२१), रविंद्र शंकर चित्रकथे (२९) सागर आप्पा चित्रकथे (२०) अशी मृतांची नावे आहेत. विशेष म्हणजे गणपती विसर्जनाच्या वेळी कोणत्याही प्रकारची वाजंत्री न वाजवता मुलांनी विसर्जन केले.
धक्कादायक.. नंदुरबारमध्ये गणेश विसर्जनावेळी एकाच कुटुंबातील सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू
गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरूणांचा तलावात बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. यात एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश असून, बुडणाऱ्या एकाला वाचवण्याच्या प्रयत्नात या सहाही तरूणांचा मृत्यू झाला आहे.
विसर्जनानंतर आंघोळ करण्यासाठी गावालगत उत्तरेला गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या छोट्याशा तलावात अंघोळीला गेले असता पैकी पहिला मुलगा बुडताना त्याने आरडाओरडा केला त्यावेळी इतर पाच जण त्याला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी गेले. परंतु, त्यांच्याही दुर्दैवी अंत झाला. एकाच कु़टूंबातील चार जणांसह एकूण सहा जणांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार मनोज कुमार खैरनार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सहाही मृतदेह शवविच्छेदनासाठी म्हसावद ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.