नंदुरबार - जिल्ह्याची ओळख कुपोषणाचा जिल्हा अशी आहे. लॉकडाऊनच्या काळात नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणाची आकडेवारी चारपट वाढल्याने चिंता वाढली आहे. नेमकी नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणाची आकडेवारी वाढण्यामागील कारण काय, यावरील एक खास रिपोर्ट...
'प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संख्येत वाढ'
लॉकडाऊनपूर्वी नंदुरबार जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांची संख्या 1064 इतकी होती. मात्र लॉकडाऊन झाल्यानंतर कुपोषित बालकांसाठी अमृत आहार योजनेतील आहार योजनेतील पोषणआहार वेळेत पोहोचू शकला नाही. त्याचसोबत अंगणवाडी बंद असल्याने लसीकरण आणि आरोग्य तपासणी होऊ शकला नसल्याचे समोर आले आहे. 13 ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील तीव्र कुपोषित बालकांची संख्या 3764 इतकी झाली आहे. तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या 18 हजार 644 झाले आहे. त्याचसोबत 21 हजार बालकांचे स्थलांतर झाल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनकाळात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात कुपोषणाची संख्या वाढल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या लतिका राजपूत यांनी केला आहे.
- मार्च महिन्यातील तीव्र कुपोषित बालकांची संख्या 1064
- मार्च महिन्यातील मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या 6104
- लॉकडाऊननंतर समोर आलेली आकडेवारी
- एकूण तपासणी करण्यात आलेल्या बालकांची संख्या 1, 71, 650
- तीव्र कुपोषित बालके - 3764
- मध्यम तीव्र कुपोषित बालके - 18, 644
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची अंगणवाडी केंद्राला भेट
आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गंत जिल्ह्यातील आरोग्य व पोषण निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी 21 डिसेंबर 2020 ते 9 जानेवारी 2021 या कालावधीत विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून मोहिमेच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी जुने तोरणमाळ येथील अंगणवाडी केंद्राला भेट दिली. या विशेष मोहिमेअंतर्गत 100 टक्के माता व बालकांची तपासणी करण्यात यावी. नियोजित दिवशी माता किंवा बालक अनुपस्थित राहिल्यास त्या भागात भेट देण्यासाठी पुढील दिवस निश्चित करण्यात यावा. कुपोषित बालक आढळल्यास बालविकास केंद्र किंवा बाल उपचार केंद्रात त्वरीत उपचार सुरू करण्यात यावेत. तसेच झापी आणि खडकी येथील आरोग्य केंद्र आणि अंगणवाडीला भेट देऊन मोहिमेबाबत मार्गदर्शन केले.