नंदुरबार - दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर विसर्जन मिरवणुका काढल्या जातात. या मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांचा दणदणाट पाहायला मिळतो. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान ढोल-ताशांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात व्यावसायिकांची वर्षभराची कमाई होऊन जाते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करण्यावरही मर्यादा आल्या आहेत. परिणामी ढोल-ताशा व्यावसायिक संकटात आले आहेत.
कोरोनामुळे ढोल-ताशा कारागीर आर्थिक संकटात; लाखोंची उलाढाल ठप्प - नंदुरबार ढोल-ताशा निर्मिती व्यवसाय
विसर्जन मिरवणुकीसाठी लागणारे ढोल व ताशे बनवणारे कारागीर नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यातील गणपती मूर्ती बनवण्याच्या कारखान्यांप्रमाणे ढोल-ताशे बनवणारे कारागीरही प्रसिद्ध आहेत. संपूर्ण राज्यभरातून या ठिकाणच्या ढोल-ताश्यांना मागणी असते. यावर्षी कोरोनामुळे मात्र, हा व्यवसाय संकटात आला आहे.
![कोरोनामुळे ढोल-ताशा कारागीर आर्थिक संकटात; लाखोंची उलाढाल ठप्प Dhol-tasha](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8574719-769-8574719-1598509652154.jpg)
गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी नंदुरबार जिल्हा प्रसिद्ध आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे विसर्जन केले जाते. विसर्जन मिरवणुकीसाठी लागणारे ढोल व ताशे बनवणारे कारागीर नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यातील गणपती मूर्ती बनवण्याच्या कारखान्यांप्रमाणे ढोल-ताशे बनवणारे कारागीरही प्रसिद्ध आहेत. संपूर्ण राज्यभरातून या ठिकाणच्या ढोल-ताश्यांना मागणी असते.
यावर्षी मात्र, कोरोनामुळे सरकारने मिरवणुका आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. याचा परिणाम ढोल-ताशांच्या विक्रीवर झाला आहे. गणेशोत्सवात गजबजलेली ही दुकाने आता ओस पडली आहेत. त्यामुळे लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे तर, शेकडो कारागिरांचा रोजगार गेला आहे. काही जणांनी तयार केल्या वस्तूंची रस्त्याच्या कडेला दुकाने थाटली आहेत. मात्र, त्यांनाही अल्प प्रतिसाद मिळत आहे. ढोल- ताशांचा पारंपरिक व्यवसाय असणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.