नंदूरबार - कोरोनाच्या पार्श्भूमीवर सुरु असलेल्या पाचव्या लॉकडाऊनमध्ये काही नियम शिथील करण्यात आले आहे. यामध्ये परराज्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, कामगार येण्यास सुरुवात झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यात तब्बल 60 हजार मजूर, विद्यार्थी व नोकरदार परराज्यातून विविध शहरातून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने गावोगावी जाऊन आरोग्य तपासणी मोहीम राबवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
बाहेरुन आलेल्या प्रत्येकाची तपासणी करण्याची लोकप्रतिनिधींची मागणी - नंदूरबार न्यूज
नंदूरबार जिल्ह्यात तब्बल 60 हजार मजूर, विद्यार्थी व नोकरदार परराज्यातून विविध शहरातून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने गावोगावी जाऊन आरोग्य तपासणी मोहीम राबवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
नंदूरबार जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी बरेचसे कोरोना रुग्ण परजिल्ह्यातून आल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासन यंत्रणा कुठेतरी कमी पडत असल्याचे समोर आले आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण 36 पॉझिटिव्ह रुग्ण असून, त्यापैकी 28 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 5 रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, बाहेरून आणि परराज्यातून आलेल्या नागरिकांमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्याची मागणी माजी आमदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे.
जिल्ह्यात दाखल झालेल्या नागरिकांची तालुकानिहाय आकडेवारी पाहता नंदूरबार तालुक्यात 21 हजार 375, नवापूर तालुक्यात 4 हजार 925, तळोदा तालुक्यात 8 हजार 911, शहादा तालुका 7 हजार 303, अक्कलकुवा तालुका 8 हजार 863 धडगाव तालुक्यात 9 हजार 485 मजुरांची शासकीय नोंद झाली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने प्रशासनाने ग्रामीण भागात आणि शहरी भागात नव्याने सर्वे करून आरोग्य तपासणी करावी, त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यास मदत होईल.