नंदुरबार -आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के सी पाडवी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 11 रुग्णवाहिका आणि 2 शववाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता काय उपाय योजना करावी याबाबत चर्चा करण्यात आली.
रुग्णवाहिकेचे लोकार्पण
माझगाव डॉक शिपबिल्डर्स मुंबई यांच्या सामाजिक दायित्व निधीतून या रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. रुग्णवाहिकेसाठी 1 कोटी 22 लाख आणि शववाहिकांसाठी 30 लाख असा एकूण 1 कोटी 52 लाख रु. एवढा खर्च करण्यात आला आहे. रुग्णवाहिकांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने मदत करणे शक्य होईल, असा विश्वास ॲड.पाडवी यांनी यावेळी व्यक्त केला आहे. रुग्णवाहिकांचा उपयोग प्राधान्याने कोरोना चाचणी पथक व कोरोना रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी करण्यात येणार आहे. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, माजी मंत्री पद्माकर वळवी, विजय चौधरी, अभिजित मोरे तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या हस्ते 11 रुग्णवाहिकांचे लोकार्पण
एकत्रितपणे कोरोना संकटाचा मुकाबला करा- के सी पाडवी कोरोनाचे संकट गंभीर असून सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. प्रशासनातर्फे कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देण्याची गरज आहे. कोरोना विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी नागरिकांना आवाहन करावे. प्रत्येक गावात कोरोनाबाबत सर्वेक्षण आवश्यक असून त्याबाबत प्रशासनास सूचना देण्यात येतील. लोकप्रतिनिधींच्या सूचनाही कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी महत्वाच्या ठरतील, असे त्यांनी सांगितले.
रक्तदान शिबिरांचे आयोजन करा
'जिल्ह्यात रक्ताचा मर्यादीत साठा असल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करून नागरिकांना रक्तदानासाठी सर्वांनी प्रोत्साहित करावे, तसेच सर्व राजकीय नेत्यांनी आपापल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी सहकार्य करावे. जिल्ह्यातील रक्त तुटवडा दूर करण्यास कश्याप्रकारे मदत होईल? यावर गंभीरतेने विचार करावा'. असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
आश्रमशाळांच्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करा
'दुर्गम भागातील कोरोना संपर्क साखळीचा शोध तातडीने घेण्यात यावा आणि या भागातील नागरिकांना कोरोना चाचणीसाठी मार्गदर्शन करावे. कोरोना चाचणीचा अहवाल नागरिकांना लवकर उपलब्ध करून देण्यात यावा. जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करावे'. असे खासदार डॉ. हिना गावीत यांनी सुचविले.
व्यावसायिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे- पालकमंत्री
कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यातील दुकानदार, व्यावसायिकांनी कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि दुकानाबाहेर ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ चा फलक लावावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी केले. दुकानात सॅनिटायझरची सुविधा ठेवण्यात यावी आणि शारीरिक अंतराचे पालन करण्यात यावे. भाजीपाला आणि फळविक्रेत्यांनी आपल्या हातगाड्या किंवा स्टॉल निश्चित करून दिलेल्या अंतरावर लावावे. त्याचबरोबर दुकानदारांच्या सुचनांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.दुकानदारांनी प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून संकटाच्यावेळी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आव्हान पालकमंत्र्यांनी केले.
रेमडेसिवीरबाबत जनतेच्या मनातील गैरसमज दूर करा
जिल्ह्यातील डॉक्टरांनी रेमडेसीवीर औषधाचा उपयोग केवळ गरजू रुग्णांसाठी करावा. रेमडेसीवीरबाबत नागरिकात असलेला गैरसमज दूर करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावा, असे आवाहन पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले. रुग्णालयांनी रेमडेेसीवीर औषधासाठी जिल्हा प्रशासनाकडे मागणी करावी. रुग्णाचा जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. रुग्णांच्या मनातील भिती घालवितांना त्यांना उपचाराबाबत मार्गदर्शन करावे. शासनाने निश्चित केलेल्या दराचा फलक रुग्णालयाबाहेर लावावा. कोरोनाचे संकट अधिक गंभीर होत असल्याने एम. डी मेडिसीन डॉक्टरांनी आठवड्यातील एक दिवस आपली सेवा जिल्हा प्रशासनास द्यावी. जिल्ह्यातील डॉक्टरांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे. आदिवासी भागात डॉक्टरांचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे माणूसकीच्या भावनेने स्वयंस्फुर्तीने आपली सेवा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी द्यावी. डॉक्टरांचे काम हे देवाप्रमाणे आहे. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांचे कार्य महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. डॉक्टरांनी रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी सहकार्य करावे. रेमडेसीवीर औषधाचा उपयोग मार्गदर्शक सूचनेनुसार करावा. आवश्यक नसताना सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णासाठी ऑक्सिजन बेडचा उपयोग करू नये. संकटाच्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे. काही दिवसातच आरटीपीसीआरची दुसरी प्रयोगशाळा सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली. हेही वाचा -"पंतप्रधान, राष्ट्रपतींनीही रुग्णालयात लस घेतली, मग राज्यातील काही नेते वेगळे आहेत का?"