नंदुरबार- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होऊन वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाभरात सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार नवापूर तालुक्यात संचारबंदीचे पालन केले जात असल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.
नवापूर तालुक्यात आतापर्यंत 6 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा स्वॅब घेण्यात आला आहे. त्यातून 860 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. 786 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. तर सध्या 125 रुग्णांवर उपचार सुरू असून तालुक्यातून 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हाभरात लावण्यात आलेल्या सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंतच्या कडक संचारबंदीचे तंतोतंत पालन केले जात आहे. सायंकाळी सहा वाजेनंतर नागरिक आपले व्यवसाय, दुकाने व प्रतिष्ठाने बंद करण्यास सुरुवात करतात व सायंकाळी सात वाजेपर्यंत शहर पूर्णतः बंद होत आहे, अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.