नंदुरबार -नंदुरबार जिल्हा गुजरातच्या सीमावर्ती भागात वसला आहे. गुजरातप्रमाणेच नंदुरबार जिल्ह्यातही संक्रांतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा केला जात असतो. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमधील पतंगाच्या बाजारपेठा सजल्या असून, पतंग खरेदीसाठी ग्राहकांनी दुकानावर गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
पतंगामधून सामाजिक संदेश
यावर्षी विविध सामाजिक संदेश देणारे पतंग मोठ्याप्रमाणात बाजारपेठेत दाखल झाले आहेत. कोरोनाबाबत पतंगांच्या माध्यमातून जनाजागृती करण्यात येत आहे. सामाजिक संदेश देणारे हे पतंग ग्राहकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. बाजारपेठेत एक रुपयापासून ते 100 रुपयापर्यंतचे पतंग उपलब्ध असून, पतंगप्रेमी आपल्या आवडीप्रमाणे पतंग खरेदी करताना दिसत आहेत.
पर्यावरणपूरक मांजा
नंदुरबारमध्ये तयार करण्यात आलेल्या मांजाला विशेष अशी मागणी असून, त्यात हा मांजा बनवण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने हा मांजा पर्यावरणपूरक असतो. मांजामुळे पर्यावरणाची हाणी होत नाही, मात्र मांजा हा मजबूत असल्याने हा मांजा खरेदिसाठी गर्दी होते. शिस्म पावडर आणि बारीक काच लावून हा मांजा तयार केला जातो.
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगाच्या बाजारपेठा सजल्या नायलॉनचा मांजा विक्रेत्यांवर पोलीसांची नजर
नायलॉनच्या मांजामुळे दरवर्षी अनेक अपघात घडत असतात, त्यामुळे अशा मांजावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र बंदी असूनही नायलॉन मांजाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात विक्री होते. अशा विक्रेत्यांवर पोलिसांची नजर असून, बंदी असलेला मांजा आढळून आल्यास पोलीस कारवाई करत आहेत.
पतंग उत्सवातून लाखोंची उलाढाल
गुजरात राज्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा केला जात असतो. पतंग आणि मांजा विक्रीतून नंदुरबारच्या बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होते. कोरोनामुळे मंदीचे सावट असलेल्या बाजारपेठेत यामुळे एक नवे चैतन्य आल्याचे पाहायला मिळत आहे.