नंदुरबार- जिल्ह्यातील शहर पोलीस ठाणे हे संवेदनशील पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात गुन्हे होत होते. मात्र, कोरोनामुळे संचारबंदी असल्याने गुन्ह्यांत मोठी घट झाली आहे. तर टाळेबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या वाहनांधारकावर दंडात्मक कारवाई करत पोलिसांनी तीनशेहून अधिक वाहने जप्त केली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर मोटारसायकल चोरी, घरफोडी, हाणामारी, असे गुन्हे नंदुरबार शहरात घडत होते. मात्र, 23 मार्चला टाळेबंदी घोषीत झाल्यानंतर शहरातील गुन्ह्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. संचारबंदीमुळे नागरिक घरातच असल्यामुळे चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून गेल्या दहा दिवसात एकही चोरी किंवा घरफोडीचा गुन्हा नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात घडला नाही. तर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असून पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असल्यामुळे शहरात हाणामारी सारखे प्रकार देखील घडलेले नाहीत.