नंदुरबार -तालुक्यातील कोळदा ते खोंडामळी रस्त्याने रात्री बनावट दारूची वाहतुक केली जात असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून कारवाई केली आहे. या कारवाईत दोन वाहनांसह सुमारे 11 लाख 34 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल असलेला बनावट दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. यावेळी दोन संशयित पसार झाले असून पथकाने तिघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या तिघा संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईमुळे मद्य तस्करांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
नंदूरबार : खोंडामळी रस्त्यावर साडेअकरा लाखांचा बनावट दारूसाठा जप्त, तिघांना अटक
नंदुरबाल तालुक्यातील कोळदा ते खोंडामळी रस्त्यावर बनावट दारुची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करण्यात आली. या वाहनांमध्ये एकून सुमारे ११ लाख ३४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नंदुरबार तालुक्यातून अवैधरित्या बनावट दारूची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. या पथकाने कोळदा ते खोंडामळी रस्त्यादरम्यान रात्री 9.30 च्यादरम्यान सापळा रचला. यावेळी भरधाव वेगात येणार्या महिंद्रा लोगान व टाटा व्हिस्टा या दोन वाहनांना अडवून पथकाने तपासणी केली. या दोन्ही वाहनांच्या मागील सीटवर व डिक्कीत विविध प्रकारचे विदेशी मद्य आढळून आले. या दोन्ही वाहनात एकूण दोन्ही 23 खोके विदेशी मद्य 1104 मद्याच्या बाटल्या आढळल्या. या शिवाय महिंद्रा लोगान वाहन (एम.एच.21 व्ही.9000), टाटा व्हिस्टा वाहन (क्र.एम.एच.19 ए.एक्स.4625) व तीन विविध कंपनीचे मोबाईल असा एकुण 11 लाख 34 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी दिलीप नाना कोळी (रा.विखरण ता.नंदुरबार), विकास शिवाजी कोळी, राहुल सुकलाल बोरसे (दोघे रा.दलवाडे ता.शिंदखेडा) या तिघांना पथकाने ताब्यात घेतले आहे. बनावट दारु पुरवठादार नारायण माळी (शिरपूर) व त्यांचा सहकारी सचिन सोनवणे (रा.मेथी ता.शिंदखेडा) हे दोघे पसार झाले आहेत. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे नाशिक विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, राज्य उत्पादन शुल्क नंदुरबारचे अधिक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक अनुपकुमार देशमाने, दुय्यम निरीक्षक मनोज संबोधी, प्रशांत पाटील, सुभाष बाविस्कर, हेमंत पाटील, हंसराज चौधरी, अजय रायते, हर्षल नांद्रे यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा तपास मनोज संबोधी करत आहेत.