नंदुरबार- कृषी उत्पन्न बाजार समितीत सीसीआयने कापूस खरेदीला सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसामुळे कापसात आद्रतेचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. त्यानंतर खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा कापूस कमी भावात खरेदी करून त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात होती. याबाबत तक्रारी आल्यानंतर सीसीआयने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर खरेदी सुरू केली आहे.
खेरेदी केंद्रावर कापसाला सरकारी हमीभाव प्रमाणे दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केल जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील कापूस ओला झाला होता. बाजार समितीत सदर कापूस हा १८ ते २० टक्के ओला असल्यामुळे भारतीय कपास निगम यांच्या १२ टक्केपर्यंत ओलावा या मापदंडात बसत नव्हता. त्यामुळे सीसीआयच्या अधिकार्यांनी कापसाची खरेदी शासनाच्या हमी भावानुसार केली नाही. बाजार समितीच्या परवानाधारक खरेदीदारांनी सदर कापसास ४ ते ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने शेतकर्यांना भाव देवू केले. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आल्याने शेतकरी आपला कापूस विक्री न करता परत घेवून गेला होता.