नंदुरबार - आदिवासी विकास महामंडळाच्या तेलपंप वाटप योजनेसह घरगुती गॅस युनिट वाटपात १३ कोटींचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चौघांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - टाटा-मिस्त्री प्रकरण; एनसीएलएटीच्या त्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने लाभार्थ्यांसाठी तेलपंप आणि घरगुती गॅस वाटप योजना राबवण्यात आली होती. या तेलपंप वाटप योजनेत १२ कोटी १० लाखांचा तसेच घरगुती गॅस वाटप योजनेत ८४ लाखांचा असा एकूण १३ कोटींचा अपहार करुन शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. सोपान संबारे यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन विजतंत्री गोकुळ रतन बागुल (रा.शेवगे, ता. साक्री ), तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक संभाजी राघो कोळसे, आकाशदिप विद्युत कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष अरुण शेवलाल कोकणी, उपाध्यक्ष गिरीष उदेसिंग परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ प्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवटे करत आहेत.
हेही वाचा - मुंबईत आढळले कोरोना व्हायरसचे दोन संशयित रुग्ण; कस्तुरबा रुग्णालयात दाखल
२००४ ते २००९ या कालावधीत आदिवासी विकास विभागामार्फत कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या होत्या. या योजनांचा लाभ अनेक वाड्या-पाड्यांना झाला असला तरी यात आर्थिक गैरव्यवहारही मोठ्या प्रमाणात झाला. अनेक योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना न देता संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने यात अपहार केला.