नंदुरबार - कोरोना प्रतिबंधासाठी कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग झालेला नंदुरबार येथील पोलीस कर्मचारी संसर्गमुक्त झाल्याने त्याला फुलांच्या वर्षावात जिल्हा रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयात जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्याचे स्वागत केले. तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने कोरोनामुक्त पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी पोलीस बँडसह सहकाऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
यावेळी परीक्षाविधीन सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. भोये, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह ) सिताराम गायकवाड, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, डॉ. के.डी. सातपुते, डॉ. राजेश वसावे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जे.आर. तडवी, गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शिरीष जाधव, शहर पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर आदी उपस्थित होते.