नंदुरबार- पेणनंतर राज्यातील सर्वात मोठे गणेशमूर्ती बनविणारे कारखाने नंदुरबार शहरात आहेत. मात्र, यावर्षी कोरोनाचा सर्वाधिक फटका गणेशमूर्ती बनविणाऱ्या कारखान्यांना बसला आहे. अजूनही गुजरात आणि मध्यप्रदेशातून मंडळाच्या मूर्तीसाठी मागणी न झाल्याने मूर्तिकार चिंतीत झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती कायम राहिल्यास घरपोच गणेशमूर्ती पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असतो. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर मूर्तिकारांचे कारखाने आहेत. शहरात गणेशमूर्ती बनविणारे जवळपास २०० पेक्षा अधिक लहान मोठे कारखाने आहेत. त्यातून ५ हजारपेक्षा अधिक लोकांना बाराही महिने रोजगार मिळत असतो. मात्र, यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असल्याने कारखान्यातील लगबग मंदावली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा केवळ २५ टक्के मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. त्याचसोबत ५ फुटांपेक्षा मोठ्या गणेशमूर्तींची अजून नोंदणी सुरू झाली नाही. त्यामुळे यंदा मोठ्या मूर्ती न बनविल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागेल. त्याचबरोबर यावर्षी उलाढाल कमी होईल, असा अंदाज मूर्तिकार सुनील चौधरी यांनी व्यक्त केला आहे.