नंदुरबार -केंद्र सरकारने आणलेल्या कृषी तसेच कामगार कायद्याला विरोध करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगतसरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत आज (शनिवारी) हे आंदोलन करण्यात आले.
शेतकरी शेतमजूर आणि कामगार यांच्या प्रश्नांबाबत काँग्रेसने जनजागृती करण्यास सुुरुवात केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने संपूर्ण राज्यभरात सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. केंद्र सरकारने आमच्या या आंदोलनाची दखल घ्यावी. तसेच केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरीविरुद्ध काळे कायदे रद्द करावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि दिवंगत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.