नंदुरबार - धर्मादाय आयुक्त कार्यालय नंदुरबार यांच्यावतीने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील नवविवाहितांसाठी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात जिल्ह्यातील 70 नवविवाहित जोडप्यांचा विवाह संपन्न झाला.
नंदुरबार जिल्ह्यातील 70 जोडप्यांचा सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न.. एरवी लग्नाच्या स्थळी नवरदेवाला लग्नमंडपात आणण्यासाठी घोड्यावर बसून येताना तुम्ही बघितले असेल, परंतु नंदुरबार येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात चार ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये बसवून वाजत गाजत लग्नाची वरात काढून नवरदेवाना लग्न मंडपात आणण्यात आले. धर्मादाय आयुक्त कार्यालय नंदुरबार यांनी सलग दुसऱ्या वर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून जिल्ह्यातील एकूण 70 नवविवाहित जोडप्यांनां विवाह बंधनाची रेशीमगाठ बांधून पुढच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. धर्मदाय आयुक्त कार्यालय यांच्यावतीने मागच्या वर्षी एकूण 84 जोडप्यांचा विवाह लावण्यात आला.
जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असताना आदिवासी पाड्यातील लोकांना मुलामुलींचे विवाह करण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. यातच अशा प्रकारच्या विवाह सोहळ्याचे आयोजन जिल्ह्यातील नवविवाहितांसाठी चांगले असल्याचे मत वधू वर यांनी व्यक्त केले. या विवाह सोहळ्यात एकूण 70 जोडपे होती, त्यापैकी 26 जोडपे ख्रिस्ती धर्माची होती. त्यांचे विवाह ख्रिस्ती धर्माप्रमाणे नंदुरबार येथील चर्चच्या फादर द्वारे करण्यात आले. दुसरीकडे 44 जोडप्यांचे हिंदू वैदिक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाले. या ठिकाणी असलेली व्यवस्था पाहुण्यांसाठी केलेला पाहुणचार व जेवणाची सोय उत्तम प्रकारे करण्यात आली होती.
सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रशासनाबरोबरच जिल्ह्यातील देणगीदारांनी व विविध संस्थांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली. लग्नासाठी लागणारे कपडे मंगळसूत्र, अंगठी तसेच विवाहानंतर नव जोडप्यांना संसारासाठी लागणाऱ्या वस्तू व भांडी देणगीदारा द्वारे भेट देऊन आशीर्वाद देण्यात आले. धर्मदाय आयुक्त कार्यालय द्वारे नवविवाहीत जोडप्यांना विवाह झाल्याचे प्रमाणपत्र देऊन विवाह झाल्याचे घोषित करून भावी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.