नंदुरबार- जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी प्रत्येक आठवड्यात एका तालुक्याचा आढावा घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार त्यांनी नवापूर तालुक्याला भेट देऊन कामांची पाहणी केली. यावेळी नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या योजनांना जलद गतीने मंजुरी देऊन उपायोजना राबवण्याचे त्यांनी आदेश दिले. तर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही ठिकाणी त्यांनी जाऊन पाहणीही केली.
जिल्हाधिकारी बालाजी मंजुळेंचा नवापूर तालुका दौरा, घेतला दुष्काळाचा आढावा - पाहणी
जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी नवापूर तालुक्याला भेट देऊन कामांची पाहणी केली. यावेळी नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या योजनांना जलद गतीने मंजुरी देऊन उपायोजना राबवण्याचे त्यांनी आदेश दिले.
जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांचा हा निर्णय जिल्ह्याच्या विकासकामांना गती मिळण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मंगळवारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी मंजुळे हे नवापूर तालुक्यात पोहोचले. तालुक्यातील सुरू असलेल्या कामावर संबंधित अधिकाऱ्यांना पाहणी करण्यासाठी त्यांनी पाठविले. काही ठिकाणी स्वतः जाऊन त्यांनी पाहणी केली. दुपारी साडेतीन वाजता अधिकार्यांची आढावा बैठक त्यांनी घेतली. यामध्ये सुरू असलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
तालुक्यात ज्याठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या भागातील अधिकाऱ्यांना सुविधा पुरवण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या पाहणी दौर्यात नवापूर तालुक्यातील सोनपाडा गावात 2016 - 17 दरम्यान 100 केवीचे ट्रांसफार्मर बसवण्याची मंजुरी मिळाली होती. मात्र प्रत्यक्षात काम झालेले नाही, असे आढळून आले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कामाच्या चौकशीचे अहवाल द्यायला सांगितला आहे. या निर्णयामुळे प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामांना वेग येईल आणि निर्णय प्रक्रिया जलद होईल, प्रशासनही कामाला लागेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.