महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात अडकलेले बिहारचे नागरिक अन् विद्यार्थी रेल्वेने गावाकडे रवाना - Nandurbar News

कोविड-19 प्रतिबंधासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बिहार येथील काही मजूर आणि जामीया संकुलातील विद्यार्थी जिल्ह्यात अडकले होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यानंतर या नागरिकांकडून घरी जाण्याची मागणी करण्यात येत असल्याने पालकमंत्री अ‍ॅड. के.सी. पाडवी यांनी शासन स्तरावर प्रयत्न केले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी बिहारच्या सचिवांशी संपर्क साधून या नागरिकांना स्विकारण्याची विनंती केली.

Nandurbar Corona Update
नंदुरबार कोरोना अपडेट

By

Published : May 6, 2020, 10:12 AM IST

नंदुरबार - लॉकडाऊनमुळे नंदुरबार जिल्ह्यात अडकलेल्या 2 हजार 14 बिहारी नागरिकांना दोन विशेष रेल्वेने बिहारला पाठवण्यात आले. यात दरभंगा येथील 992 आणि सहरसा येथील 1 हजार 22 नागरिकांचा समावेश आहे. सुखरुप गावाकडे जायला मिळत असल्याने या सर्वांनी शासन आणि प्रशासनाला धन्यवाद दिले.

जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड. सीमा वळवी, खासदार डॉ. हिना गावीत, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, मंडळ रेल्वे प्रबंधक जीव्हीएल सत्यकुमार, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा आदी रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.

जिल्ह्यात अडकलेले बिहारचे नागरिक अन् विद्यार्थी रेल्वेने गावाकडे रवाना

कोविड-19 प्रतिबंधासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बिहार येथील काही मजूर आणि जामीया संकुलातील विद्यार्थी जिल्ह्यात अडकले होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यानंतर या नागरिकांकडून घरी जाण्याची मागणी करण्यात येत असल्याने पालकमंत्री अ‍ॅड. के.सी. पाडवी यांनी शासन स्तरावर प्रयत्न केले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी बिहारच्या सचिवांशी संपर्क साधून या नागरिकांना स्विकारण्याची विनंती केली. याबाबत गेल्या 15 दिवसापासून पाठपुरावा सुरू होता. यासाठी मुंबई येथील नियंत्रण कक्षाचे देखील सहकार्य घेण्यात आले.

या सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बिहार येथे जाण्यासाठी त्यांचे आवश्यक प्रमाणपत्रे तयार करण्यात आली. त्यानंतर बिहार प्रशासनाने मजूर आणि विद्यार्थ्यांना स्विकारण्यास सहमती दर्शवली. रेल्वे विभागाशी प्रशासनाने संपर्क साधून रेल्वेद्वारे बिहारमधील नागरिकांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून नायब तहसीलदार आणि वैद्यकीय अधिकार्‍यांनी संबंधित तालुक्यातील नागरिकांशी समन्वय साधला. सर्व प्रवाशांची नोंद घेण्यात आल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून या प्रवाशांना रेल्वेत बसवण्यात आले. सायंकाळी साडेतीन व चार वाजता या दोन रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या.

साधारण दोन हजार व्यक्ती सुखरुप आपल्या गावाकडे जात आहेत. त्यांना कुटुंबाला भेटण्याचा आनंद मिळणार आहे, याचे पालकमंत्री म्हणून समाधान आहे. सर्वांची चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना आपल्या गावी जाता यावे यासाठी शासनाने देखील बिहार प्रशासनाशी चांगला समन्वय साधला. बाहेरच्या राज्यातील व्यक्तींना सुखरूप जाता यावे आणि आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित गावी येता यावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत असे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी सांगितले.

लॉकडाऊन वाढल्यामुळे गावाकडे जाण्याचा नागरिकांचा आग्रह होता. बिहार प्रशासनाने सहकार्याची भूमीका दाखवल्याने आणि रेल्वेने देखील तातडीने सहकार्य केल्यामुळे या नागरिकांना त्यांच्या गावी पाठवणे शक्य झाले आहे. सर्वांच्या चेहर्‍यावर असलेला आनंद संपुर्ण टीमचा उत्साह वाढवणारा आहे. आपत्ती व्यवस्थापन कार्यात असे काही माणूसकीचे क्षण कायम स्मरणात राहतात, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.

जामिया संकुलाचे मौलवी हुजैफा, मौलवी ओवैस वस्तानवी, मुख्याध्यापक फारुक जहागिरदार, मौलाना जावेद पटेल, अखलाख शेख हेही विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. प्रशासनाने मदत केली म्हणूनच विद्यार्थी सुखरुप आपल्या घरी जात आहेत, असे जामीया संकुलाचे अध्यक्ष मौलाना गुलाम वस्तानवी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details