नंदुरबार - जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने हवामान खात्याने येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतील मिरची विक्री बंद राहील, त्याचप्रमाणे राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र पुढील सूचना येईपर्यंत बंद राहील, अशी माहिती बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण व तुरळक पाऊस होत असल्याने नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मिरची खरेदी व विक्री पुढील सूचना येईपर्यंत बंद राहील. तसेच बाजार समितीचे व्यवहार सुरळीत झाल्यानंतर शेतकऱ्यांना याबाबत कळवण्यात येईल. पुढील सूचना येईपर्यंत शेतकऱ्यांनी मिरची बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये, अशी माहिती बाजार समितीचे सचिव यांनी दिली.
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मिरचीची खरेदी व विक्री होत असते. शहरात मोठ्या प्रमाणावर तिच्या पथारी आहेत. तुरळक झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. मिळेल त्या साधनांनी मिरची एकत्र करून तिला गोळा करून झाकण्यात आले.