नंदुरबार Child Death In Nandurbar :आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात 'पानगळ' सुरुच असून तीन महिन्यात तब्बल 179 नवजात बालकं दगावल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. यात जुलै महिन्यात 75 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे तर ऑगस्टमध्ये 86 बालकांचा बळी गेला आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 18 बालकं दगावली आहेत. ही जीवितहानी रोखण्यासाठी शासनानं लक्ष्य 84 डेज मिशन सुरु केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सावन कुमार यांनी दिली आहे.
तीन महिन्यात झाले 179 बालकाचे मृत्यू :नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी पाड्यावरील माता आणि बालमृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे शासन बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र तरीही मागील तीन महिन्यात तब्बल 179 बालकांचे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे. यात जुलै महिन्यात 75 बालकांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्टमध्ये तब्बल 86 बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 18 बालकं दगावल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.
तब्बल 70 टक्के बालमृत्यू होतात 0 ते 28 दिवसात :नंदुरबार जिलह्यात झालेल्या बालमृत्यूंची आकडेवारी हादरवून टाकणारी आहे. मात्र यातील 70 टक्के बालमृत्यू हे केवळ 0 ते 28 दिवसात झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. पालघर जिल्ह्यात एकूणच असणाऱ्या असुविधा आणि मातांना मिळणारं पोषण याचा बालमृत्यूवर मोठा परिणाम करत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.