नंदुरबार - देशातील सर्वात जुन्या अश्व बाजाराला नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे सुरुवात झाली आहे. हा यात्रोत्सवास दत्त जयंतीला मोठ्या थाटात सुरू झाला. देशातील अश्वप्रेमी या अश्व यात्रेची आतुरतेने वाट पाहतात. गेल्या ३०० वर्षांची परंपरा असलेला हा घोडे बाजार दरवर्षी रुबाबदार घोड्यांमुळे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालतो आहे. या यात्रेतील 'चेतक फेस्टिवल'ला 3 वर्षापासून सरकार मदत करीत होते. मात्र, यावर्षी सरकारने मदत दिली नसल्याने लोकसहभागातून चेतक फेस्टिवलचे मोठ्या उत्सहात आयोजन केले जात आहे.
मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे श्रीदत्त जयंतीनिमित्त देशातील सर्वात जुना घोडे बाजार भरतो. याठिकाणी गेल्या ३०० वर्षांपासून घोडे बाजार भरत आहे. याठिकाणी अध्यात्म आणि जातिवंत अश्वांचा पर्वणीचा अनोखा संगम येथे पाहायला मिळतो. एकीकडे याठिकाणी एकमुखी श्रीदत्ताचे मंदिर असल्यामुळे दरवर्षी सारंगखेड्यात यात्रोत्सव साजरा केला जातो. तर, दुसरीकडे देश विदेशातील अश्वप्रेमींना येथे भरणारा घोड्यांचा बाजार खुणावत असतो. या अनोख्या यात्रोत्सवात दरवर्षी ८ ते १० लाख भाविक श्री दत्ताचे दर्शन घेण्यासाठी येतात. या सर्व भाविकांना श्री दत्त दर्शनासोबत ओढ लागलेली असते ती येथे भरणाऱ्या जागतिक दर्जाच्या घोडे बाजाराची. देशातील अश्वप्रेमी या यात्रेची आतुरतेने वाट पाहतात. तर, जगाच्या कान्या कोपऱ्यातून अश्वप्रेमी या घोड्याच्या बाजाराला भेट देतात आणि घोड्यांची खरेदी विक्री करतात.
यावर्षी हा घोडे बाजार आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्याचा प्रयत्न करण्या आला आहे. यावर्षी लोकसभागातून होत असणारा चेतक फेस्टिवल डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. हा उत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो भाविक आणि पर्यटक सरंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलला भेट देत असतात. लहान वयाच्या घोड्यापासून तर पूर्ण वाढ झालेले घोडे येथे सहज मिळतात. याठिकाणी येणाऱ्या घोड्यांचा रुबाब, त्याची चाल आणि त्याचे गुण वैशिष्ट्य येथे येणाऱ्या प्रत्येकाला आपलेसे करते.