नंदुरबार - गवळी समाजात शेकडो वर्षांपासून 'सगर' पशुधनाचे पूजन करण्याची परंपरा आहे. दीपावली पाडवा व बलिप्रतिपदेनिमित्त मुक्या प्राण्यांचा सगर उत्सव नंदनगरीचे आकर्षण असते. या निमित्त रेड्यांचे पूजन केले जाते. यंदा मात्र कोरोना संकटामुळे साध्या पद्धतीने सगर पूजन करण्याचा निर्णय गवळी समाज पंच मंडळाच्या वतीने घेण्यात आला.
नंदूरबारमध्ये सगर उत्सव साजरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी नंदुरबार शहरातील ऐतिहासिक सोनी विहिर परिसरात या सगर उत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे शिवशरणार्थ असे म्हणत या सगर उत्सवाची अतिशय साध्या पद्धतीने सांगता करण्यात आली. देशावर, समाजावर कोणतेही संकट येऊ नये. यासाठी यमराजाचे वाहन असलेल्या रेड्याची या उत्सवात पूजा करण्यात येते.
राज्यभर साजरा केला जातो उत्सव
राज्यासह देशात ज्या ज्या ठिकाणी गवळी समाज आहे, तेथे दिवाळी सणाच्या काळात सगर उत्सव अर्थात रेड्यांसह गाई-म्हशींच्या पूजनाला महत्त्व आहे. वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने शेकडो वर्षांपासून या पंरपरेचे जतन करण्यात येत आहे. या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रेड्यांची मिरवणूक देखील काढण्यात येते.
कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा केला उत्सव
यंदा कोरोनाच्या संकटामुळे अतिशय साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी या उत्सवात रेड्यांच्या झुंज पहायला मिळतात, मात्र यावर्षी हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. रेडा हे यमराजाचे वाहन आहे. तर समाजाच्या दृष्टीने गाय आणि म्हैस हे लक्ष्मीचे रूप आहे. त्यामुळे कोणतेही संकट येऊ नये. भरभराट व्हावी यासाठी या प्राण्यांची पूजा केली जाते. गवळी बांधव आपल्या म्हशी व रेड्यांच्या शिंगांना हिंगूळ व गळ्यात झेंडूच्या माळा लावून, त्यांच्या अंगावर रंगबिरंगी झूली टाकून त्यांना सजवतात. त्यानंतर सजवलेल्या प्राण्यांची शहरातील गवळीवाडा, बालवीर चौक, देसाईपुरा, अमृत चौक परिसरातून मिरवणुक काढण्यात येते, व त्यानंतर सोनी विहिरीजवळ हा सगर उत्सव भरवला जातो.
गवळी समाजाच्या वतीने परंपरा कायम
कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहेत. मात्र गवळी समाजाने साध्या पद्धतीने का होत नाही, पण सगर उत्सवाचे आयोजन करून आपल्या पंरपरेत खंड पडू दिला नाही. यापुढे देखील हा उत्सव असाच सुरू राहील, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
दिवसेंदिवस रेड्यांच्या संख्येत घट
दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे रेड्यांना लागणारी ढेप, चारा, पशुखाद्य पुरेशा प्रमाणात मिळत नाही. परिणामी गेल्या दोन-चार वर्षांत शहरातील रेड्यांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. एकेकाळी मोठ्या प्रमाणावर रेड्यांची संख्या होती. मात्र, आजच्या स्थितीत बोटावर मोजण्या इतक्या गवळी समाज बांधवांकडे रेडे आहेत. वाढत्या महागाईमुळे रेड्यांचे पालन-पोषण करणे अवघड झाले आहे. मात्र तरीदेखील शेकडो वर्षांची पंरपरा असलेला सगर उत्सव गवळी समाजाच्या वतीने साजरा केला जातो.