नंदुरबार- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, यासह अनेक मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात शांतता कमिटीच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहरातील दादावाडी पोलीस अधीक्षकांनी बैठकीत सांगितले की, गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करा, मिरवणूक काढू नका त्याच्याबरोबर गोळा झालेला पैसा चांगल्या कामात वापर करून सतकरणी लावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आगामी गणेशोत्सवावर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले, की कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यावर्षीच्या गणेशोत्सव साध्या पद्धतीने व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करावा. सध्याची परिस्थिती पाहता गणेश मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेऊन शासन व प्रशासनाला सहकार्य करावे. जेणे करून कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यास मदत होईल. जे गणेश मंडळ यावर्षी श्रींची स्थापना करणार नाहीत. त्यांनी कुठलाही संकोच न ठेवता त्या गणेश मंडळांना पुढील वर्षी श्रींच्या स्थापनेसह मिरवणूक काढण्यासाठी परवानगी असणार आहे. तसेच साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करताना मंडळांनी श्रींची स्वागत व विसर्जन मिरवणूक काढू नये, तसा ठराव करावा. यावर्षीचा गणेशोत्सव आदर्श व कोरोना संकटावर मात करण्याच्या दृष्टीने साजरा केल्यास खर्या अर्थाने कोरोनावर मात करण्यास मदत होईल. तसेच सार्वजनिक गणेश उत्सव असला तरी, या गणेशोत्सवानिमित्त होणारा खर्च कोरोनासाठी आर्थिक सहाय्य म्हणून दिल्यास ती गणेश मंडळे आदर्श ठरतील. म्हणून गणेश मंडळांनी योग्य तो निर्णय घेऊन मार्गदर्शक सूचनेनुसार श्रींची स्थापना व गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी गणेश मंडळांना साध्या पद्धतीने आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी प्रास्ताविकातून मार्गदर्शक सूचना सांगितल्या. या बैठकीत काही गणेश मंडळांनी यावर्षी गणेश उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे. यावेळी गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांचे शांतता कमिटीच्या सदस्यांनी गणेश उत्सवा बाबत मनोगत व्यक्त केले.
या बैठकीला नंदुरबार शहरातील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी व शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी व गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित होते. याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी वसूमना पंत, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस उपअधीक्षक सिताराम गायकवाड, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, शहर पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.