नंदुरबार -दत्त जयंतीच्या निमित्ताने सारंगखेड्यामध्ये भव्य अशी दत्ताची यात्रा आयोजित करण्यात येत असते. या यात्रेला शेकडो वर्षांची पंरपरा आहे. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा रद्द करण्यात आली असली तरी देखील दत्ताची जयंती पारंपरीक पद्धतीने साजरी करण्यात आली. मंदिरात सर्व पूजा विधीवत पार पडल्या. मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करून देण्यात आले होते. यावेळी भाविकांनी टप्प्या टप्प्याने कोरोनाचे सर्व नियम पाळून दत्ताचे दर्शन घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकावेळी केवळ 50 भाविकांना मंदिरात सोडण्यात येत होते.
दत्त जयंतीनिमित्त विधीवत पूजन
दत्त जयंतीनिमित्त सारंगखेडा येथे मंदिर प्रशासनाच्यावतीने विधिवत पूजन करून 56 भोगांचे नैवेद्य दाखविण्यात आले. त्यानंतर सकाळी महाआरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत भाविकांनी दर्शन घेतले.