नंदुरबार -कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेली कापूस खरेदी एका दिवसातच बंद करण्यात आली आहे. बाजार समितीत विक्रीसाठी आणला गेलेला कापूस ओला असल्याने व्यापाऱ्यांकडून कापसाला कमी दर मिळत आहे. यामुळे शेतकर्यांनी हमी भावात कापूस खरेदीची मागणी केली होती.
सीसीसीआयच्या मापदंडामुळे कापसाला हमीभाव नाकारला, कापसाची खरेदी-विक्री बंद - नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती
कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेली कापूस खरेदी एका दिवसातच बंद करण्यात आली आहे. बाजार समितीत विक्रीसाठी आणला गेलेला कापूस ओला असल्याने व्यापाऱ्यांकडून कापसाला कमी दर मिळत आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पळाशी येथील राजीव गांधी कापुस खरेदी केंद्रात कालपासुन बाजार समितीच्या परवानाधारक कापुस खरेदीदार यांच्याकडून कापूस खरेदीला सुरुवात झाली. मात्र, काही दिवसांपूर्वी नंदुरबार तालुक्यातील झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील कापुस ओला झाला आहे. हा कापूस 18 ते 20 टक्के ओला असल्यामुळे भारतीय कपास निगम यांच्या 12 टक्केपर्यंत ओलावा या मापदंडात हा कापूस बसत नाही. यामुळे सीसीसीआयच्या अधिकार्यांनी एकही वाहन शासनाच्या हमी भावाने खरेदी केले नाही.
सदरच्या परिस्थितीत वातावरणात आद्रता असल्यामुळे शेतातील कापूस काढणीनंतर नैसर्गिकरित्या 18 ते 20 टक्के दरम्यान ओलावा आहे. भारतीय कपूस निगम ही केंद्रशासनाची किमान आधारभुत किंमतीने खरेदी करणारी नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. त्यामुळे निर्धारित केलेले मापदंड तात्काळ शिथील करुन शेतकर्यांच्या 18 ते 20 टक्केदरम्यान ओलावा असलेला कापूस किमान हमीभावाने खरेदी करणेबाबत आदेश देण्यात यावे अशी मागणी होत आहे.