महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वादग्रस्त स्नेहभोजनप्रकरणी अखेर नगरसेवकावर गुन्हा दाखल - नगरसेवक परवेझ खान यांच्यावर गुन्हा दाखल

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने स्नेहभोजनास 50पेक्षा जास्त व्यक्तींना आमंत्रित केल्याचे निष्पन्न झाले आहे.

nandurbar police register case against municipal council member
वादग्रस्त जेवणावळी प्रकरणी अखेर नगरसेवकावर गुन्हा

By

Published : Jun 12, 2020, 2:43 PM IST

नंदुरबार -संचारबंदीमध्ये शहरातील नगरसेवक परवेज खान याने मुलाच्या विवाहानिमित्त स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. संचारबंदी, साथरोग प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग आणि 50पेक्षा जास्त व्यक्तींना आमंत्रित केल्याप्रकरणी नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार स्नेहभोजन प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. या चौकशी समितीमधील तहसीलदारांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. स्नेहभोजन कार्यक्रमावरून शहरात वादंग पेटला होता. याप्रकरणी प्रशासनाने गुन्हा दाखल केला असून यापुढे काय कारवाई होईल? याची उत्सुकता शहरवासीयांना लागली आहे.

नंदुरबार नगरपालिकेचे नगरसेवक परवेज खान यांनी मनाई आदेश लागू असताना या आदेशाचा भंग करून झराळी येथील फार्म हाऊसवर मुलाच्या लग्न समारंभानिमित्त स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास 50 व्यक्तींची परवानगी असतना त्यापेक्षा अधिक व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. स्नेहभोजन प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भारुड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक नंदुबार यांची संयुक्त समिती नेमण्यात आली होती.

स्नेहभोजन कार्यक्रमाच्या आयोजनात 50 पेक्षा जास्त व्यक्तींना आमंत्रित करणे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याने आणि संसर्गजन्य आजार पसरून मानवी जीवितास धोका उत्पन्न होण्याची ही कृती आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संचारबंदी आदेश आणि साथ रोग प्रतिबंधक कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल नंदुरबार येथील परवेज खान यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम 188, 268, 269, 290,34 सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 54 आणि साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्नेहभोजन कार्यक्रम प्रकरणी नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे. तरी गेल्या तीन दिवसांत भाजपा, मनसेने याप्रकरणी नगरसेवकावर कारवाईच्या मागणीचे निवेदन प्रशासनाला दिल्याने वादंग पेटला आहे. यासंदर्भात नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला असला तरी यापुढे काय कारवाई होईल? त्या पार्टीत कोण उपस्थित होते? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details